Thursday, October 11, 2012

मेरीस... (83, जुलै-ऑगस्‍ट)


83, 26 जुलै
मेरी...
असेच अनंताची टिंबे देत कुठवर राहायचे ह्या टिंबांना काही अर्थ असतो ?
टिंबे...व्‍याकुळतेचे निदर्शन.
टिंबे...आर्ततेचे वाहक.
टिंबे...अव्‍याहततेची जाणीव.
असाच टिंबांचा अर्थ लावत असतो आपण. पण ह्या अर्थाला काही अर्थ असतो का ?
असलाच तर कोणाला गवसतो का ?
गवसला तरी व्‍यक्‍त होतो का ?

83, 28 जुलै
अर्थगर्भ ओळींचा शोध कधी संपणाराहे हा शोध म्‍हणजे तरी निश्चित काय ?
स्‍वप्‍ने अर्थ शोधत फिरतात अनंताच्‍या टिंबांवरुन...बेफाम धावत.
अगदीच निरर्थक !
अर्थवाही स्‍वर प्रसविणारा कंठ किती दांभिक !
83, 29 जुलै
सुरांसंगे डोलावे माणसाने.
पण मेरी...
ज्‍याचे सूरच हरवले असतील त्‍याने ?
हल्‍ली तुझ्या मनातले सूर माझ्या हास्‍याची झालर लेवून येताहेत. पण मी स्‍तब्‍ध आहे. नि तू भ्रमात आहेस.
माझ्या अस्तित्‍वाचे सत्‍य तुझ्यापासून दूर आहेसध्‍यातरी.
तुला कशी यावी कल्‍पना ?
मी ऐकतोय तेच सूर.
तेव्‍हा एका अनामिक हुरहुरीने ऐकलेले.
नि आता मात्र पाणावलेल्‍या डोळ्यांनी. दाटलेल्‍या हुंदक्‍यांनी...
हल्‍ली हे हुंदके न् डोळे तुझ्यासमोर येत नाहीत.

83, 2 ऑगस्‍ट
येणा-या वसंताला सामोरे जा.
विधानार्थी प्रश्‍न करुन आशेची पाखरे उधळलीस.
पुन्‍हा पुन्‍हा विचारलेस.
माझे मौन. नंतर विषयांतर.
मी काय द्यावे उत्‍तर ?
...सभोवार भिरभिरताहेत नर्तनारी पाऊले.
दोन डोळे...खोल. कोरडलेल्‍या विहीरतळाचे.
दोन डोळे...समुद्रओढल्‍या सरितेचे.
तुझा प्रश्‍न. डोळे. यांची अखंड भिरभिर. यातच आज उगवला.
आज काहीसे स्थिरत्‍व आहे. प्रश्‍न पुन्‍हा निरखतोय.
आशेची पाखरे तुझी परत बोलाव.
माझी पाखरे मरुन गेलीयत.
क्वचित एखादा आभास. पाखरे जिवंत झाल्‍याचा. पुन्‍हा प्रत्‍ययास सत्‍य. पाखरांच्‍या मृततेचे.
मी तुला आभासांविषयी काहीच बोललो नाही ना ?
खरे तर मी हे बोलायला हवे होते. पूर्वीच.
काहीच न लपविण्‍याचे ठरविल्‍यानंतर आता का मी हे माझ्याजवळ ठेवतोय ?
आता मी वेगळा वाटतोय. वेगळा वागतोय. सगळ्यांच्‍या दृष्‍टीने.
मला हे पूर्णतः पटतेय. कारण मलाही मी आता वेगळाच जाणवतोय.
मीही शोधतोय हा बदल कसा ?
बदल मी घडविला नाही. अगदी आपसूक. श्रावणमेघांसारखा.
ही प्रक्रिया अजूनही चालूच आहे. कधी संपेल. कुठवर चालेल. यात मीही अनभिज्ञ.
फक्‍त बघतोय...ही निर्विकारता तटस्‍थता की अजून काही ?
ह्या प्रक्रियेत सतत रंग बदलत जाते माझे तत्‍त्‍वज्ञान.
नि ह्या बदलत्‍या तत्‍त्‍वज्ञानाचे उपयोजन होत गेले तर-
तर कदाचित कोणाच्‍याच दृष्‍टीत मी मी’ उरलो नसेन.
तू मग उगीचच अन्‍वयार्थ लावत विद्ध होत जाशील.
ती एक संध्‍याकाळ होती. जेव्‍हा क्षितिज आरक्‍त झाले अचानक आषाढात.
कुठेतरी स्‍पर्शली हुरहूर...
पण स्‍तब्‍धता तशीच.
आणि ती रात्र....
मेरी...रात्र बरेच काही देऊन जाते. बरेच काही घेऊन जाते.
मी स्‍पष्‍टच का सांगत नाही सारं शब्‍दांची वेटोळी उगीचच वेटाळत जातात आशय.
.........................
.........................

83, 3 ऑगस्‍ट
कोणाचीच कदर करु नको. आलेल्‍या संधीचा फायदा घेत चल. ह्या बदललेल्‍या तत्‍त्‍वज्ञानाची कास मी धरलेली आवडेल तुला मेरी ?
.........................
पण मेरी...मी पूर्णतः स्‍तब्‍ध असतो. मला गुंतणे जमेनासेच झालेय मेरी. प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा करुनही रुतलेले आतले मी काढून टाकू शकत नाही ग !
........................
हे सगळं तुझ्या अपरोक्ष घडतेय.
इथला वसंत तुझ्या लक्षात आलाय. मी मौन राहिलोय. मला गुंतता येत नाहीये. मी काय करु ?
बदलत्‍या तत्‍त्‍वज्ञानाप्रमाणे वागलो तर-
पण नाही...हे शक्‍य नाही.
माझ्यातला बुद्ध’ मला कुरतडू लागलाय...
मेरी...
तुला मी हे प्रत्‍यक्ष सांगणार केव्‍हा ?

83, 10 ऑगस्‍ट
मेरी...
असं कसं सुरु झालं ग तुझं अनपेक्षित वागणं?
मेरी...माझ्यापासूनही दूर जावेसे वाटतेय तुला?
सगळं आभाळच कोसळून पडतंय असं वाटू लागलंय.
ही सगळी नाती मेणाची आहेत. तरीही कुठेतरी जपण्‍याचा प्रयत्‍न करायचा असतो मेरी...
मेरी...
मेरी...

83, 11 ऑगस्‍ट
अखेर मेरी माझी आहे. ती असा अविचार करणार नाही, हे मला पक्‍के माहीत आहे.
मेरी... पुन्‍हा रुळावर आलीस. तेच डबे-जोडलेल्‍या नात्‍यांचे. घेऊन भरधाव धावणार आहेस... खूप मोकळे वाटतेय... मेरी तशीच असणार आहे... पूर्वीचीच...

83, 16 ऑगस्‍ट
मेरी...
सभोवार अत्‍यंत वैभवसंपन्‍न नगरी. मोठमोठ्या हवेल्‍या. प्रासाद.
गवाक्षांतून डोकावताहेत डोळे.
कधीपासून रोखलेले...
धडकताहेत हृदयावर...
कसे सांगावे त्‍या डोळ्यांना हे हृदय आहे दगड ?
गगनचुंबी चबुतरे.
सर्व चबुत-यांवर बसलीयत गिधाडे...
ह्यांना हाकारु का ?
सगळ्या नगरीवर पडू देत तुटून...
पाडू देत फडशा सगळ्यांचा...
वाहू देत रक्‍ताच्‍या नद्या...
किती सुंदर दिसेल नाही !
अरिबाच्‍या कुरतडीने आक्रोशणा-या कैद्यापेक्षाही सुंदर !
चंद्र.
तारे.
उल्‍का.
रात्र पेटली की काय होईल ?
चंद्र, तारे... लाह्यांसारखे तडतडतील आकाशाच्‍या तव्‍यावर.
आज दोन डोळे गवसले.
ओळख पटली.
पण मी नाही दाखवली.
राजाने खांद्यावर घेतलेल्‍या प्रेतात वेताळाऐवजी मी शिरलो.
राजाला गोष्‍ट सांगितली.
एक राजकुमारी होती. तिचे कोणावर प्रेम नव्‍हते. तिचे स्‍वयंवरही होणार नव्‍हते. होती ती खूप सुंदर.
एके सकाळी दवाने डवरलेल्‍या पानावरुन तिने अलगद तर्जनी फिरवली. सुळकन एक दवबिंदू खाली घसरला.
ती शहारली. बावरली. गोंधळली... छान लाजली...
ती का लाजली ?
राजा, ह्या प्रश्‍नाचे उत्‍तर तुला माहीत असूनही तू दिले नाहीस तर परिणाम तुला ठाऊक आहे. तुझ्या डोक्‍याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील...
राजाचे मौन भंग झालेच नाही. राजाला उत्‍तरच ठाऊक नव्‍हते.
प्रेतातल्‍या मला निमूट बाहेर पडावे लागले...
आता कोणत्‍या प्रेतात शिरावे ?...
प्रेत...
प्रेत...
प्रेत... माझे. तुझे.
प्रेत... सर्वांचे.
प्रेत... सर्वस्‍पर्शी... जगङ्व्‍याळ...
मेरी... मी भूत होईन का भूत ?
कसे दिसेल माझे भूत ?
माझे भूत झाल्‍यावर तू मला कुशीत घेणार नाहीत कदाचित.
घेशील माझ्या भूताला कुशीत 

83, 18 ऑगस्‍ट
रानात कावळा
एकटाच कर्कशतोय...
का नाही पेटत झाडे ?
का पर्वत झालेत थंड ?
जळत का नाहीत मेरी तुझे डोळे ?
कोठून मिळालं हे अमरत्‍व तुला ?

83, 20 ऑगस्‍ट
मेरी... आपलीच नखं खोल रुतलेली असतात आपल्‍या आतड्यामांसात.
वाकडीतिकडी.
उपसून काढावी तर यातनाजल्‍लोषात
तुषारतात रक्‍ताची कारंजी...
आतड्यामांसाचा छिन्‍न चिखल...
मेरी... आता तरी तुझ्या शब्‍दांचे फोलत्‍व मान्‍य कर !

83, 27 ऑगस्‍ट
उडत गेले सगळे !
मी कुणाचाही नाही
माझेही कोणी नाही.
...ह्या ओळींच्‍या तीव्रतेचे शिखर गाठत निघालोय मी.
भुकीस्‍त रात्री बेफामत निघतात तेव्‍हा मी मुळासकट उखडून काढतो वधस्‍तंभ नि खांद्यावर घेऊन उतरु लागतो त्‍या अपार दरीत.
दरी...
ह्या शिखरावरुन त्‍या शिखराआड इतक्‍या चोरपावलांनी सरकतो सूर्य की दरीला अजूनही अज्ञात राहावा सूर्य.
लांडगे मला हाकारताहेत
मी बेछूट सामोरा जातोय...
वखवखलेले जबडे माझ्या अंगभर...
रान...
गुहा...
मेरी...
क्षणांपूर्वीचे आपण क्षणानंतर नसतो. नाती मेणाची असली तरी जपायची असतात. हे माझंच वाक्‍य आता सपशेल डोक्‍यावर उभं राहिलंय. त्‍याने शीर्षासन घातलंय.
कोणतीच नाती जपायची नसतात
नाती ...कशासाठी ?
निव्‍वळ भास !
आपलेपणाची एक भ्रांती !
मी उतरवू पाहतोय ती...
वाटा उरफाट्या...
जिने उरफाटे...
तूही आता परकी आहेस मेरी...

मेरीस... (83, सप्‍टेंबर-ऑक्‍टोबर)

83, 2 सप्‍टेंबर
शांत, संथ कुरण
गवताचे .
कुठून आली झुळूक ?
गवतात का अचानक सळसळ ?
नयनक्षेत्राच्‍या कोनातून
दोन तीर अचानक !
नंतर अविरत लाटा कटाक्षांच्‍या
डुचमळवत गवतडोह...
केसांच्‍या सरीतून भिरभिरली बोटे;
सरींच्‍या कोशात तीरही तीव्र !
हा आजचा मत्‍स्यकोन
दिसेल का पुन्‍हा ?

मेरी...
पाय-या उतरणारी पावलं...
संथ गवताचे टोकही न ल‍वविणारी.
एका गुहेच्‍या तोंडाशी
जाळ होऊन उभी.
एक अजस्र पोळणूक...
द्वार सारण्‍यास न धजणारी.
नयनकिरणांची सन्‍मुखता नाकारणारी...

त्‍यादिवशी-
ते द्वार. खाडकन बंद.
डोळे धडकत राहिले त्‍यावर काही क्षण.
संपली प्रतीक्षा घरट्यातल्‍या जीवाची ?
की पिसांत लपविली मान रागाने ?
स्‍मृतींचे विवर
हसले भयाण
पावले द्वारविन्‍मुख...

हेलकावे...
चुंबकत्‍व...
मला अपेक्षित.
प्रवासाचे हेच वैशिष्‍ट्य असते.
मत्‍स्‍यकोन तो
पुन्‍हा...पुन्‍हा...
चालेल. थांबेल. संपेलही.

83, 6 सप्‍टेंबर
हरितगंध
रक्‍तमृत्तिकेवर चकाकतो
कोवळी चमक. पर्णवेली शीत.
सुवर्णसाळ लखलख हलते.
मेरी गोंजारशील ती ?
ताम्रधूल स्‍पर्शशील तू ?

कपोत पाहिलाहेस तू ?
कावळ्याचा डूख तुला माहीत नसावा.

चंद्रसावल्‍या...
तरंग... तरल...
भरारशील तू ?

दीर्घकाळ लोटला
मी तिकडे गेलोच नाही.
ती स्थिर असेल ?
द्वार नकळत उघडले असेल ?

मेरी केव्‍हा दिसेल ती तुला ?
मी अपराधी आहे तिचा ?

गुलमोहराखाली ती असावी
असे वाटतेय का मला ?

कारंजे गोठून गेलेय...
का हा हिमप्रपात ?
मेरी... फ्रीजमध्‍ये बाटलीत पाणी गोठले तर-
तडकते ना बाटली ?
पावा घुमतोय...
मी का नाही निर्देशवत तो ?

83, 9 सप्‍टेंबर
अंतराय...
महाप्रचंड.
चेह-यावरील रेषांत सूक्ष्‍म हालचाल.
थरथरल्‍या लाटा.
दोलते स्मित ?
कशासाठी डोळे भेदताहेत डोळे ?

मला सापडली नाही ग ती कवटी !
कोणत्‍या पिशाच्‍च्‍याने पांघरली ती ?

चितेवरील कवटीचा फटाक्‍यासारखा
आवाज ऐकलायस मेरी ?

रोज सकाळी वाटेतल्‍या झाडावरचा
कर्कश्‍यणारा कावळा
मरुन पडलेला
माझ्याच वाटेवर...

घळर्इत मी उभा असतो
एका अनामिक प्रदेशात.
एक प्राणांतिक आरोळी...
रोम न रोम
सुखदतेने झंकारत...

असे का बनले कातळकडे हिमनग ?
का झालेत प्रवाही वितळून ?

मी वाहणार नाही.
मला पोहायला चांगले येते.
पण कुठवर पोहू ?
हा तर अथांग सागर झालाय !

बेट.
बेटावरील नरभक्षक राक्षस.
पंख आहेत त्‍याला
उंचही तो खूप खूप आहे.
नखांची लांबीही खूप खूप आहे.

भोजराजा आणि कालिदास,
सिंहासन बत्तिशी,
वेताळ पंचविशी,
गुलबकावली,
राजपुत्र ठकसेन,
तोता मैना,
कामशास्‍त्र,
कामसूत्र,
कोकशास्‍त्र,
वात्‍स्‍यायन,
कोकापंडित.

स्निग्‍ध ओठांची परी
लावण्‍याचा डोंब उसळवत
समुद्रातून बाहेर पडते. नग्‍न.

जहाज उध्‍वस्‍त.
सुकाणू छिन्‍न.

83, 15 सप्‍टेंबर
ती हसली. खुलली. रेंगाळली.
चांदण्‍यांची फुले उधळली.

बाहेर सूर्य.
कलत्‍या क्षणांचा सोबती असावा.
ढगाळून बरंच आलंय.

कोंदटता किती अभेद्य !
भेदण्‍यास असमर्थ
हास्‍यशलाका.

तिला अजून बरंच अज्ञात असावं !
वर्षणारा गुलमोहर
खैर झाला की मला नक्‍की ज्ञात होईल,
तिलाही बरंचसं ज्ञात झालंय.

काल मी दरवाजाजवळ होतो.
पण घरालाच मी अज्ञात होतो.

83, 17 सप्‍टेंबर
भुरके भुरके पुंजके ढगांचे आकाशात.
किती छान दिसतात !
मग नजरांची कोळिष्‍टकं का वाटतात ?

एक चाफा.
शुभ्र. सगंध. वर्षभर बहरलेला.
अंगणात बाहेर फणसाशी लगडलेला.
दवात चाफा न्‍हाऊन धुंद.
चिवारीत उभा ओलेता.
वादळाचे सूर दूर दूर चाललेत.
चंद्र सापडला जर आवर्तात-
ती बेछूट वाटतेय...
खूप उसळतेय...
ही भरती मला नवी नाही !
पण ओहोटीच्‍या यातना तिला नव्‍याच असतील....

मेरी
मी दुर्बोध झालोय असे वाटतेय ना तुला ? पण मी मला दुर्बोध झालो नाही, असे राहून राहून वाटतेय. की मलाही मी दुर्बोध झालोय ?
सतारीच्‍या तारेवरुन आता कोणीच जात नाही. तारेची कंपनेच जोरदार. कोण सांभाळेल चालताना तोल ?
दिवसेंदिवस मी समर्थ होत चाललोय. हे कळलं तर तुला खूप खूप आनंद होईल ना मेरी ?
पण मी हे सांगून तू विश्‍वास ठेवणार आहेस का ?
पण मी सांगणार तरी केव्‍हा ?
हल्‍ली तुझा पान्‍हा दूर आहे माझ्यापासून.
तुफानलेले आसमंत.
घोंघावणारा समुद्र.
आक्रोशणारी रात्र.
आदिवासींचा नाच. बलिस्‍थानाभोवती फेर.
भाल्‍यांची पाती. रक्‍ताळलेले डोळे...
खरंच मी समर्थ आहे का मेरी ?

83, 4 ऑक्‍टोबर
मेरी...
दिलासणारी ही अक्षरे पुन्‍हा वाटली.
आपण एकमेकांस शब्‍द देऊ लागलो पुन्‍हा.
पण फक्‍त शब्‍दच.
माझा किनारा दूरच.
अजूनही.

मी थांबलोच नाही.
कोण दुखावलं पाहिलंच नाही.
बराच बधीर काळ
मला भासलेला आनंदाचा.

पण आज मीच दुखू लागलोय...
मनात लुसलुशीतपणा जाणवतोय
मेरी...
तुझ्या कुशीत...
मेरी... मेरी...

बेटावरचा राक्षस
मला पंजात धरु पाहतोय.

ती किती वेळा डोकावली असेल ?
किती निमित्‍ते झाली असतील तिची ?

डोकं फोडून टाकावं
छिन्‍न कवटीला कॅनव्‍हासवर चोपडावं
राक्षसाच्‍या दिवाणखान्‍यात
तेवढंच एक मॉडर्न आर्ट.

कळसांची रांग
भाल्‍यांची टोकं
ही कोण गणिका सांजप्रहरी
बुद्धविहारी ?

मेरी...
तू तरी सांग ग तिला
'मी आयुष्‍य कधीच हरवलोय'.

83, 13 ऑक्‍टोबर
निश्‍चलता खंबीर...
मेरी...
यातनाहीन...
83, 20 ऑक्‍टोबर
निश्‍चलता किंचित भंग...
मेरी
मी यातनांसमीप.

पण गलितगात्र होऊन पारंब्‍या
अधोमुख नाहीत.
किंवा विस्‍मरणाच्‍या प्रयत्‍नांचे तकलादू ढोल नाहीत.
निमित्‍ते. टिंक्‍चर आयोडीन
कशाची गरज नाही.
तोंडावर रुमाल गुंडाळून ऑपरेशन कधीच नाही.

सरळ घाव
मुक्‍त रक्‍तओहोळ...
धमनी दाबण्‍याचा निष्‍फळ प्रयत्‍न पूर्ण बंद.

अजस्र, महाकाय
गुदमरवणारे मेघ
हल्‍ली संपूर्ण सीमाबाह्य. हद्दपार.

मीनाच्‍या 'दुकानांत कधीच न जाण्‍याचे ठरवून भागते का ?
किंमत तर मी ठरवतच नाही.
काही विकत घ्‍यायचे आता राहिलेच नाही.
पण येणा-या नजराण्‍यांचे काय ?

83, 21 ऑक्‍टोबर
चांदण्‍याची विक्री कोण करतो ?
चांदणे...
शारद सुंदर चंदेरी राती...
नभातून गिरक्‍या घेत कोण बडवतं पडघम ?
वाद ळाने प्राणायामासाठी कुठे जावे ?

83, 24 ऑक्‍टोबर
नौकेच्‍या शीडाचं
टोकही लुप्‍त...
नभातल्‍या चंद्राने आता कोणावर बरसावं ?

मेरी...
मी स्‍तब्‍ध. समुद्रासारखा.

समुद्र कोण देशीचा ?

मी प्रतीक्षेत ?
काय पण भ्रम तुझा !
वळणावरच्‍या झाडाखाली
कोणीतरी उभे असेल...
पण मला वळणच नाही ग !

एक उभा चढ.
काटकोनात चढणे मलाच ठाऊक.

व्‍यवहार...
माझ्यात. तुझा आरोप.
कांचनमृग मला मिळवायचा नाही.

पेटलेली शेकोटी
विझवलीय मी.
व्‍यवहाराच्‍या निकषावर पुन्‍हा पेटवू शकतो मी !

पण ज्‍वाळा नाहीत, हे तुला दिसत असताही
का प्रयत्‍नशील तू
क्रूसावरील हातात रुतलेले खिळे काढण्‍यासाठी ?

मेरी...
अजूनही अखेरचा टाहो
फोडला नाही मी, हेही लक्षात ठेव.

83, 25 ऑक्‍टोबर
सगळे प्रवासी
उतरते झाले बोटीतून.

बेट तसं निर्मनुष्‍य
आता मात्र समनुष्‍य.

पिवळ्या मेघांतून सुवर्णाचा शिडकावा
ते अंग अंग शहारले.
तंबू कोठे ठोकावे ?

परतीचा प्रवास कसा असतो ?
दरवाजाची वीण पूर्ण उसवेल जेव्‍हा
कारंजे उसळेल का तेव्‍हा ?

कारंजे...
नक्षत्रं उधळतंय सातत्‍याने.
नेणिवांच्‍या गर्भाशयात
का पाखरे हुंकारताहेत ?

बर्थ डे.
एक की दोन देऊ ?
नको. एकच पुरे.
माझ्या बर्थडेला दोन हं !
हो. हो.

एक मोठा तुकडा. चिमटीत
तळहात स्‍पर्शित बोटांनी.

थरथर.
मनभर, अंगभर,
स्‍वैरपणे.
स्‍वैरता.
कोप-यात,
दारात,
माजघरात.

इत्‍यादी. वगैरे.

बर्थ डे आधी दीर्घ अपारदर्शित्‍व.

83, 27 ऑक्‍टोबर
अपारदर्शित्‍व झटकन दूर.
मोकळा रंगमंच.

ओळख आहे ना ?
बस्‍स काय...
तुम्‍ही काय मोठी माणसं ! आमचं काय ?

गुहेत शिरताना
भुयारपार होणारी पावलं वेगात असतानाही स्‍तब्‍ध.
मला हे अभिप्रेत.
त्‍यानंतरचं वगैरे वगैरे, इत्‍यादी, आणि, .
सारं अभिप्रेत.

चित्रमालिका
अपेक्षा सापेक्ष.
पुन्‍हा दीर्घ अपारदर्शित्‍व.
माझी अव्‍यक्‍तता
कशी कळावीत तिला प्रयोजनं ?

पुनवेच्‍या चंद्रानं
गरगर फिरावं क्षितिजावरनं भुईचक्रासारखं.
चांदण्‍यांची फुलं मुक्‍त उधळावी न्
घुसमटावं धसमुसळत बेभानतेनं.

ती जपेल प्राजक्‍त ?
अट्टाहास कारंज्‍याचा विरेल का कधी ?

गती अग्निबाणाची
गुरुत्‍वाकर्षणकक्षा भेदण्‍याची,
निष्‍कर्ष सद्यक्षणीचा.

पण लक्ष्‍य अजूनही
अस्‍पर्श. अभेद्य.

का ?
पण असे का ?

मेरी तुझा सध्‍याचा वारंवार प्रश्‍न.
दबा धरुन भक्षकाच्‍या पवित्र्यात.

83, 28 ऑक्‍टोबर
विराट, कभिन्‍न
पडदा.
प्रयत्‍न व्‍यर्थ.
बराच झिरझिरला.

पाय-यांवरुन लोळ
एकांतात माझ्यावर.
चकवा.
माझे पलायन.

झिरझिर पुन्‍हा.
विणू पाहतोय.
दिव्‍यांची आवली.
दीप
ती लावेल.
मंद ज्‍योत.
समुद्रपार बेटातील गुहेत. जल्‍लोष.

मला जायचेय गुहेत.
ओढ वेगवान.
याक्षणी.