मेरीची प्रतिक्रिया
१४ जानेवारी १९८५
तुझा वाढदिवस...
अचानक मेघानं लुप्त व्हावं नि बेधुंदपणे बरसावं अचानकपणे
तसे तुझे-माझे रुसवे फुगवे.
भेटीगाठी.
उद्याच्या समाजाबद्दलची धो धो पावसागत बोलणी...
आज,
स्मृतींच्या असंख्य मेणबत्त्या डोळ्यात, मनात लावून
तुझा वाढदिवस साजरा करतेय.
हॅपी बर्थडे टू यू
हॅपी बर्थडे टू यू
स्मृतींच्या भरगच्च संध्याकाळी
स्मृतींच्या पानगळीशिवाय
काहीच नव्हतं देण्यासारखं हाती,
तुला प्रेझेंट म्हणून.
हातापायाला खिळे ठोकून
क्रुसी खिळलेला येशू.
मेरी डोळ्यांच्या वाटा करुन
हातात एक मेणबत्ती (आशेची) घेऊन
मोठ्या आसुसलेल्या नयनाने
येशूच्या प्रतीक्षेत
त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी.
येशू...
मेरीची आर्तता, व्याकुळता
जाणतो अंतर्मनातून
तोडतो स्वतःभोवतीच्या बेड्या
नि धावत सुटतो बेबंदपणे...
शिरतो तिच्या कुशीत बेभानपणे
तिच्या वात्सल्याची ऊब मिळावी म्हणून.
मेरी आनंदलेली, हरखलेली
शांत सरोवरागत वाहणाऱ्या डोळ्यांतून
उधाणलेले अश्रू गाळीत
येशूचा बर्थडे साजरा करतेय.
येशू...
येशू तुला पुन्हा पुन्हा जन्मायचंय या पृथ्वीवर
माझ्यासाठी,
तुला मला अभिप्रेत असलेल्या समाजासाठी,
तुझ्या-माझ्या भव्यदिव्य स्वप्नांसाठी.
म्हणूनच येशू
तुझा वाढदिवस मी दरवर्षी एकटीच साजरा करते
तुझ्या अपरोक्ष
कुणालाही न कळवता.
तुला आयुरारोग्य लाभो.
तुझ्या उद्ध्वस्तलेल्या स्वप्नांना
नवी पालवी फुटो
व त्या वसंत बहारीच्या वृक्षाखाली
मेरीला शांतपणे विसावू दे.
तुझ्या वेड्या मायेच्या प्रतीक्षेत,
मेरी
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home