Thursday, October 11, 2012

मेरीस... (83, नोव्‍हेंबर-डिसेंबर)


83, 22 नोव्‍हेंबर
मेरी
काळ बराच गतिमान.
टोकं संपत नाहीत पण बोथट होतात.
कवितेचं अनपेक्षित आगमन.
हे याचंच लक्षण.
तू बरीच हलकी झाली असशील मेरी...
संपल्‍यापैकी एक सुरु झालं.
तू दिलासली असशील
कदाचित असाच दुस-याचाही प्रारंभ...
पण गुहेतले दिवे याची साक्ष नव्‍हेत.
बोथटलेल्‍या टोकांना पुन्‍हा कधी धार येईल, हीही शक्‍यता असते.

83, 23 नोव्‍हेंबर
मेरी...
माणसं सापासारखी कात टाकतात नि पुन्‍हा तेजोमय होतात. शिशिराची अवकळा फार काळ सृष्‍टीही सोसत नाही. तीही पुन्‍हा मोहरते, बहरते.

हे बदल आपणास सहज दिसतात. पण कोकीळाची साद मी ऐकतो. पण आवाजामागील भावनेचं दर्शन होत नाही. नेहमीच कोकीळा आर्त असते की ती नेहमीच आनंदी असते ? काही कळत नाही. आवाज तोच असतो. मात्र आपण आपल्‍या भावनांना त्‍या आवाजाचा साज देतो. आर्त किंवा आनंदीही.

मला कात टाकणं जमत नाही, याचा मला खेद नाही. तर कात टाकतात याचा हेवाही नाही. माणसाने कात टाकावी. जरुर टाकावी. तरच तो माणूस समाजयोग्‍यरीतीने जगू शकतो. अन्‍यथा नाही. जसा मी.

कोणाविषयी सूक्ष्‍म अढी बाळगावी, हेही जमत नाही. पण तसा समज होत असेल, हे मी नाकारत नाही. तो दूर व्‍हावा असे वाटते. पण तसा प्रयत्‍न करणे आवडत नाही.

माणसं अंतर्बाह्य कात टाकून सळसळतात पुन्‍हा त्‍याच प्रदेशात. अगदी ओळखसुद्धा दाखवत नाहीत. जुनी ओळख हीही कातच असते. तिचं अस्तित्‍व म्‍हणजे मुक्‍त सळसळण्‍यातला अडथळाच. ती सोयिस्‍करपणे टाकून देणेही माणसाला जमते. माझ्या अंगावर प्रत्‍यक्ष वारुळं दिसत नाहीत, एवढंच. आत त्‍यांचा हिमालय झालाय. काहीवेळा तो कंप पावतो. लाव्‍हा उसळतो. डोळ्यांत नाचतो. ओसंडतो नि बराच काळ चेह-यावरही राहतो.

हेही तेवढ्यापुरतंच. पुन्‍हा ते शिलाखंड आत रचतो. चेहरा समुद्र बनवतो.

गरुडाचे पंख मला आहेत. गिरिकंदरांची झेप मला अपेक्षित आहे. पहिल्‍या पावसाची नांदी देणारे मेघ दिसू लागले की मोर होणंही मला आवडतं. नव्‍हे, अपरिहार्यपणे मी होतोच. पण बहारप्रदेशात स्‍थलांतरित होणारा पक्षी बनणं मला कठीण आहे. बाग कुंपणातून कधीतरी बाहेर पडेल, ही प्रतीक्षा मी करीत नाही.

कितीतरी वेळा मी स्‍वतःबद्दलच संशयी होतो. मी बोलतो, लिहितो त्‍यापेक्षा वेगळाच आत नाही ना ?

कधी खात्री होते, तसं नाही. कधी सीमेव आंदोलनं होताहेत असं कळतं. नि लगेच त्‍या आंदोलनाला जोराचा धक्‍का देऊन निश्चित प्रदेश देतो. यात बहुधा मी लिहितो, बोलतो तोच प्रदेश असतो.

याक्षणी कितीही वारुळं साचली. कितीही वादळं, तुफानं भोवताली घुमली; तरीही मी अचल, स्थितप्रज्ञ राहीन, असं वाटतं.

जगण्‍यासाठी आशा हवी असते. तरच दिशा मिळते. ह्या दिशेने जाताना क्षणांची असंख्‍य बंदरं लिलया पार होतात.

'क्षणांची बंदरं' हा शब्‍द मी मुद्दाम वापरलाय. ज्‍याला दिशा असते, त्‍याला गती असते. दिशा नसते तो गतिहिन असतो. तिथल्‍यातिथे खचतो. साचतो. 'क्षणांची बंदरं' लिलया पार करणं त्‍याला जमत नाही. क्षणाची व्‍याप्‍ती त्‍याच्‍या साचलेपणावर अवलंबून असते. हा प्रत्‍येक क्षण म्‍हणजे यातनांचा अणू असतो.

माझ्यात ही दोन्‍ही विद्यमान आहेत. प्रमाण मात्र सम नाही. मध्‍येच गती, मध्‍येच स्‍तब्‍धता. क्षणाचा अणू तितकासा विस्‍फोटक सध्‍यातरी नाही.

खरं तर हे लिहिताना मी संशयी आहे. मी सीमेवर आहे, असे राहून राहून वाटतेय. हल्‍ली विकलता तीव्र नसते. जाणिवेची दरी पोखरत निघाली की स्थितप्रज्ञतेचा गिरी उंच होऊ लागतो. क्षणांची बदंरं वेग घेऊ घेतात.

83, 24 नोव्‍हेंबर
गुहेतले दिवे नाकारले ?
खरंच नाकारले ?
हो. पण का ?

पक्ष्‍यानं अलगद स्‍थलांतर केले.
पक्षी परतणार नाही का ?
परतला तरी पिसांचा रंग तोच असेल का ?

मेरी...
फक्‍त 'मेरी...' अशी एक आर्त साद अखेरची घालून संपेल सारं ?

मेरी...
'मेरी' ही दोन अक्षरं लिहून
एक मोठा निःश्‍वास सोडतो
नि पुन्‍हा सुळाचा अंदाज घेऊ लागतो.

कांरजं उसळतं... मेंदूला भेदणारी रक्‍तचिळकांडी...
छिन्‍न मेंद्र... सर्वदूर.

दिवाळी कशी चाललीय ?
किंवा दिवाळी कशी गेली ?

प्रश्‍नांची उत्‍तरं सत्‍याची कास धरतच नाहीत.

सुनसान हवेली...
बाहेर रातकिड्यांची सामूहिक रडारड.

येशूचा रक्‍तस्राव संपला का नाही अजून ?
कोठून येतंच एवढं रक्‍त ?
येशू का होत नाहीये निस्‍तेज ?

येशू अखंड तेवतो
चर्चबेल देतो.
मंद सूरात तनमन व्‍यापतो.

तिनेच नाकारलेले शब्‍द
ऐकण्‍याचा हट्ट धरते.
अट्टाहास करते.
मी मी दुजोरा देतो.
आतून खोल हसतो...
उध्‍वस्‍त गलबताच्‍या किना-यावरील वाळूत रुतलेल्‍या शीडाच्‍या टोकाकडे बघून कप्‍तान हसावा तसा.

सूर्याची आग
किती समुद्रस्‍नानांनी विझेल... ?

गुहेचा वेध मध्‍येच तुटतो
'सांजावताना' अंधारुनच गेलंय.

वेलींविना मांडव का वाटतोय बोडका ...?

83, 28 नोव्‍हेंबर
आज
अस्‍फुट टणत्‍कारात
वेगात सुटली तीर
...क्षणभर अस्‍मानच विस्‍कटले
घुमले बेभान विश्‍वभर.

अस्‍फुटतेने उधळले सप्‍तरंग
कारंज्‍यांची आरास
फुलांचा बहार
...अशी कशी अचानक कोकिळेने घेतली तान ?

'अचानक ?' प्रश्‍नचिन्‍ह का ?
सप्‍तरंग, बहार, आरास
अशात
कोकिळा तान घेणारच !

स्‍पर्शाची वाट मनात जाते.
अलगद शहारणं...
तरंगणं...
कुठवर असेल आज तिच्‍यात ?

वीण नकळत पडत जाते.
धागे कुठून येतात,
टाका कोणता पहिला,
यातलं काही कळतच नाही.
वीण वाढतच जाते.

वीण...
सुबद्ध्‍ा गुंता.

वीण अलगद उसवते एका बाजूने
सैलपणा पसरत जातो.
मग
निःबद्ध गुंता
सर्व व्‍यापून.

असाच गुंता 'सांजावताना'
आता
गुहेतही.

एकाच रुळावर
अनेक गाड्या...
कोठून मिळाला असा हा सिग्‍नल ?

गाड्या एकमेकांना अपरिचित
एकमेकांतून आरपार
अगदी अदृश्‍य.
जणू आपण एकटेच चाललोय
ह्या रुळावरुन...

चर्चमध्‍ये
कमाल स्‍तब्‍धता.
गुंता सुटत नाही
बळकट होतो.

चर्चमधील शांतता
नि
स्‍मशानातील शांतता
...फरक ओळखणं कठीण वाटतंय !

मेरी,
गुंत्‍यांचा पोशाख करुनच
वावरतोय मी.
कधीतरी
गुत्‍त्‍यात सोडवू पाहतो गुंता.

गुंता सुटल्‍याचा आभास
प्रचंड हलकेपण
अश्रूंत वितळतो गुंता.

गुत्‍त्‍यातून बाहेर,
आसवं कोरडवून
पाहतो पुन्‍हा...
तर
गुंता अजूनही तसाच !
कदाचित
वितळणारा गुंता
आसवांतील प्रतिबिंब असावा.

आजच्‍या अस्‍फुटावरुन
बराच आत गेलो नाही !
मेरी...
अस्‍फुटही तसंच होतं.
तुला ते कसं दर्शवू ?
अस्‍फुट हे अस्‍फुटच असतं.
स्‍फुटतं
ज्‍याच्‍यासाठी असेल. त्‍याच्‍याचसाठी.

मेरी...
डोळ्यांचे डोह असतात.
'सरोवर' हे वरचं प्रतिबिंब.
पण मेरी...
काही डोळे सरोवरच वाटतात ग !
अगदी माझ्यासारख्‍या पाणबुड्यालासुद्धा !

तुझ्या डोळ्यांविषयी बोलायचं झालं तर
मेरी...
दोन्‍ही प्रकारांत तुझे डोळे नाहीत.

तिथे आहे धबधबा
अखंड ओसंडणारा.
त्‍याला डोह नसतो. त्‍याला सरोवरही नसते.
तो असतो फक्‍त धबधबा
'आतलं;बाहेरचं'
असं काही नसलेला.

मेरी...
हा धबधबा प्रंचड सुरक्षित.
वेगात ओसंडणा-या धारांत
मी सामावतो विद्युत.

सरोवरच असणारे डोळे
तसे उत्‍तम असतात वसंत व्‍हायला.
पण मेरी...
वसंत नाकारलेल्‍याला
हे कळूनतरी
काय उपयोग... ?

ही थडगी
अन् त्‍यावरील क्रूस
कशासाठी...?
का ठेवावं पेटीत प्रेत...?

दरवर्षी
अर्पित होतात फुलांचे हार,
चक्र, फुलं...
थडग्‍यावरील क्रूसावर.
पेटीतला मी मात्र
माझाच विस्‍कटलेला सांगाडा
जुळवत
पेटीला टकरा देत.

83, 29 नोव्‍हेंबर
सुनसान रात्रीतून
फेसाळत निघतात
समुद्राची गहनगंभीर
रहस्‍ये...

मेरी-
मी कठड्यावर होतो.
हुळहुळता गारवा अंगभर.
चंद्र अस्‍ताची प्रतीक्षा करीत होता की नव्‍हता,
मला माहीत;
पण
मी मात्र करीत नव्‍हतो.

अंधारयात्रेचा
गूढ प्रवासी
हरवल्‍या नभाच्‍या
शोधातः
नभ
स्‍वतंत्र तपशील नसलेले.

भटकंती
क्षितीजभर...
अपेक्षाविहिन (?)

रात्र चढत जाते
मी आकस्मिक परततो
गतिमान तरंग
हळूवार मनात पसरत...

83, 1 डिसेंबर
किलबिलत्‍या सकाळी उठतो.
रानात जातो.
आंब्‍याच्‍या खोडावर
सुतारपक्षी
घाव घालत असतो.
मी थांबतो.
घाव मोजतो.
बराच वेळ जातो.
सुतार थकत नाही.
मी थकतो.
कोठून तरी 'कुहू'ची साद येते.
मी वळतो.
त्‍या दिशेने चालू लागतो.

ती
हळूवार खुलते.
हसते.
नि सारं वृंदावन
नजर करु पाहते.

वृंदावन.
आयुष्‍य क्षणभर स्‍तब्‍धतं.

83, 2 डिसेंबर
मेरी...
चर्चमध्‍ये
देवळातल्‍या असंख्‍य घंटा
लावल्‍या जातात
अत्‍युच्‍च बेभानतेत
बडवल्‍या जातात...
क्रूसावरचे खिळे
हादरा बसून
येशूच्‍या हातापायांच्‍या जखमा
पोखरु लागतात...

आनंदाची बेभानता
अशीही असते-
बहरल्‍या फुलांवरुन
झेपावत असता
ती थांबते
कोमेजल्‍या फुलाजवळ.
विचारते.
त्‍याला आज्ञा करते,
'मला गाऊन दाखव
तुझी मलुलता.'

कोमेजले फूल
हवालदिल...
'हिच्‍या बहारास ही
कलंकतेची
तहान कशाला...?

अजूनही
सैलता
तिच्‍या
हातात,
आंदोलनात. अगदी तिच्‍या मनासारखी.
मेरी...
कधीतरी
तिने
खंबीरता
पेरली पाहिजे ग !
हातात
तशीच मनात.

मागच्‍या स्‍थानी
परतणे,
हा आंदोलनाचा
तत्‍त्‍वधर्म
बदलायला हवा तिने
कधीतरी...
निदान कधीतरी...

83, 6 डिसेंबर
मेरी...
निर्वाणस्‍थ सूर्याच्‍या छायेत
बहरावी स्‍वप्‍नता-यांची मैफील...
त्‍यानेच उधळवली
निखा-यांवरची धूळ
आपल्‍या ऊर्जस्‍वल
फुंकरीने.
ठिणग्यांचं स्‍वयंप्रकाशित्‍व
झळाळलं दीप्‍तीमानतेने.
मठातल्‍या घंटा
घणघणल्‍या नागानंदाने.
जरी सूर्य निर्वाणस्‍थ
वेदनायुक्‍त नाही मी-
ठिणग्‍यांस पाखर घालून
माझ्यात
तेजाळतोय...
स्थिर... अभंग...!

'पण तू वाटत नाहीस रे तसा !'
अगदी, अभावित शब्‍द सटकले.
अपेक्षांच्‍या बागा
नंतरच्‍या मोसमात...
मेरी...
पावलं आक्रमण करतात
ती अशी.
83, 12 डिसेंबर
एका प्रचंड आरोळीने
उधळून द्यावीत
लगटणारी
स्‍वप्‍नांची
लक्‍तरे...
आयुष्‍याच्‍या सीमेबाहेर.

असं कसं झालं तिच्‍या हातून ?
सांजावताना,
केलेल्‍या प्रतीक्षेतून
विद्ध होत असताना.

मेरी...
शब्‍दांची तळी
नितळ असती तर-

मेरी...
शब्‍दांची तळी
तिच्‍या डोळ्यांसारखीच.

'दोष कोणाचा'
ह्या प्रश्‍नाच्‍या शोधात
आयुष्‍य संपेल.

सगळा तपशीलाचा पट
समोर मांडून
फोल आहे आता
आडव्‍या तिडव्‍या चालींचे मोजमाप.

पक्षी
स्‍थलां‍तरित होईल,
शक्‍यता नव्‍हती.
पण पक्ष्‍यांचे स्‍थलांतर उद्देश
बहारदर्शक असतात ना !
मग
शिशिरप्रवाहावर
भरारणा-या पाखराचे
स्‍थलांतर
मला का असावे
अगृहीत... ?

83, 15 डिसेंबर
मेरी...
सारे शब्‍द तुला पोच झाले.
पण शब्‍दांची जुळवण
पूर्णतः तुला साधली नाही.

अर्थात ते स्‍वाभाविक होतं.
तुझ्या स्‍वप्‍नफुलांच्‍या पंखांची कदर
मी करु शकत नाही.

उगवणा-या उद्याला
स्‍वप्‍नांनी रंगविण्‍याचा
मला षौक नाही.

बेफिकीर आयुष्‍याचा साज
माझ्यावर,
असं आता तुझ्या लेखी.

खरंय...
चारदोन शब्‍दांची उधळण
चौकशीपुरती
कोण्‍या आपल्‍याकडून
आता अपेक्षित नाही.

जखम मुक्‍तपणे वाहू द्यावी...
शुष्‍क मांसात
चोपडावी माती
पाहिजे तर 'निर्दय' या संज्ञेने.

राखेला
खाक होण्‍याची भीती
आता कशासाठी... ?

अंगणातला गुलमोहर
धडधडा पेटला,
तरी खंत नाही.

निःश्‍वासाची गोष्‍टच दूर
विझविण्‍याचा प्रयत्‍न्‍ा नाही.

वैफल्‍य
स्थितप्रज्ञतेचा पाया भरतं का... ?
मेरी...
बालिशतेच्‍या हंगामातच
प्रौढतेची वारुळं चढवली मी...
लुटूपुटूच्‍या वयात कट्यारींचे अस्‍सलत्‍व
पारखलं मी...

चिलखताची
चाहूलही नव्‍हती...

आता शिलेदारी करीत होतो.
करीन यापुढेही...
पण तितकीशी आतून नाही.

कालपरवापर्यंत
दूरवर का होईना,
एक 'घर' होतं
माझ्या दृ‍ष्टिक्षेपात...
आज अखंड
मुशाफिरीची दीक्षा...

कुठले कवडसे ... ?
कुठल्‍या तिरीपी...?
कुठलीच शलाका
जोजारणं नाही.

पायलीभर चांदण्‍या ओतून
अवकाशाचे मापन नाही.

समाधान,
खेद,
हर्ष,
दुःख,
सारे पडद्याआड.
मला अनोळखी
आहेत
ते...

83, 21 डिसेंबर
उल्‍हसित फुलांची
कारंजी... सभोवार.
मेरी...
ती कोणत्‍या फांदीवर असेल... ?
वर्षाची सुरुवात...
अखेरही...
फुलं अशीच उसळत राहतील... ?
निरोपाचं
जडशीळत्‍व
तिच्‍यात कुठवर भिनेल... ?
गोठलेपणास
कधीही आच लागू शकते...
बधीरतेचे हिमनगही
उष्‍णतेपुढे शरमिंदे होतात...

83, 24 डिसेंबर
निघण्‍यासाठी
पावलांनी तयार असावं.
पावलं तशी थांबलेली.
नसतातच मुळी,
ती चाललेलीच असतात
अखंडपणे
ती निघतच असतात
ह्या प्रदेशाकडून
त्‍या प्रदेशाकडे...

मेरी...
येशूच्‍या आगमनाचे हे दिवस...
मंद, धुंद
चर्चलयीत
प्रेयसीच्‍या कमरेस विळखा घालून
कधीच का नाचला नाही येशू
बेहोश,
बेधुंद
होत...?

किनारे अवघडून जातात
पूर्णचंद्र माथ्‍यावर येतो तेव्‍हां
जथे थबकतात
शोधात वाळूच्‍या
विसावण्‍यास.

निनावी वाटांचे
बेनाम संदर्भ.
कुठवर सजवावा
तपशीलाचा साज ?
अनाम रात्रींचे
गहिरे कढ
कुठवर जोजवावे शब्‍दांत ?

तिच्‍या सरळसोट
वाटेची किनार
जातही असेल
माझ्या वळणाचा
एखादा कोपरा उसवून...

पण म्‍हणून
तेवढ्यासाठी
थांबावे का मी
जरीचा धागा घेऊन... ?

काल
चाणाक्षपणे हेरलं
मी वितळतोय...
चटकन पकडली अजस्र पंजात
माझीच मानगुट,
उकळत्‍या लोहरसात
घुसळून काढलं स्‍वतःला
नि मग
खूपच थंड झालो
बर्फाशी
नातं
जुळवण्‍याइतपत.

No comments:

Post a Comment