Thursday, October 11, 2012

मेरीस... (84, जानेवारी-मार्च)


84, 3 जानेवारी
क्षणात किनारे जवळ
भ्रमण दिशांचे
नि उड्डाण अवकाशात...
....नव्‍या वर्षाच्‍या
अगदी प्रारंभात,
रात्रीच्‍या चढत्‍या
उन्‍मादात
कारंजलेल्‍या शुभ्रशब्‍दांनी.

दबल्‍या मनात
अस्‍पष्‍ट चाहूल, अपेक्षा;
पण अनपेक्षित
प्रतीक्षा;
तीही रात्रीच्‍या चढत्‍या प्रहरात.

विरघळत जाताहेत तरंग...
किती फोल ठरला माझा तर्क !
अजूनही वलयं...
ताजी
नव्‍या बहरानं.
मी शंकित
माझ्या प्रवाहधारी प्रदेशउतारानं...

हा आत्‍यंतिक प्रारंभक्षणीचा शब्‍दोत्‍सव
वर्षांच्‍या मंजूषेत
कुठे बरे विराजित करु... ?

84, 4 जानेवारी
मेरी...
एक अत्‍यंत संथ समुद्र.
उकळत कसा नाही
सूर्याच्‍या तप्‍त किरणांनी ?

दूरवर एक गलबत
शीड आखडून
निपचित पहुडलेलं...

अशी कशी विजनभयाणता ही
मौनात चिडीचूप पाखरंही !
सकाळचा दहिवर गोठून
आसमंत सारे विद्ध...

अचानक का ही परिक्रमा
सगळ्या अतीत बेटांची... ?
धुंद सावल्‍यांचे
बद्ध अस्तित्‍व...
कंपतही नाही कोणताच वृक्ष...
झंकारत नाही वीणा किनारी... !

मेरी...
तप्‍त दुपारी एक नशा भिनते
माझ्या प्रत्‍येक पेशीकेंद्रात...
घडलं त्‍यावेळच्‍या
कोवळिकीला 'दुपार'चाच संदर्भ तर होता !

किरणे.
कोवळी,
तप्‍त,
मलूल;
रात्र शोषत असते मदिरा म्‍हणून.

मेरी...
नशा चढली की बेभानता येते...
मेरी...
चढत चाललीय मला...
आक्रोश आवरतोय मी आतला...

सगळ्या भावनांचं गाठोडं
बांधून
जाळावं चितेत स्‍मृतींच्‍या
अगदी
ढोसून ढोसून.
व्रणही राहू नये पिळाचा म्‍हणून
कुटावं अगदी... कशासारखं मेरी... ?
कशासारखं .... ?
शब्‍द, उदाहरणं, योजना...अधुरं सारं...
अधुरं... मेरी...
दात आवळले जाताहेत...
मुठी वळताहेत...
डोळ्यांत रक्‍त कुटतंय...
कशासाठी... मेरी...
कशासाठी.... ?

84, 12 जानेवारी
नगराच्‍या वेशीवर
एक कभिन्‍न छाया पंख फैलावून...
रात्र टक्‍क उघड्या डोळ्यांत
पहाट फटफटते तरीही...

दुस-याच्‍या मृत्‍युशय्येची आच
का बसवते पोलादी गजांचा बंदोबस्‍त
माझ्या बेफिकीरीभोवती... ?

वणवाग्रस्‍त रान घेऊन
मी फिरु लागतो तेव्‍हा-
सारे समुद्र
संथ
आकाशाची निळाई शोषून...

उगवतीची स्‍वप्‍ने
अभ्राच्‍छादित
सोसाटली पाने सर्वभर...

ही तुफानाची चाहूल... ?

84, 17 जानेवारी
पाया पडू ?
नको. नको !
नंतरचा हस्‍तस्‍पर्श...

84, 18 जानेवारी
नभातून चांदण्‍याची
झिमझिम बरसात.

मेरी...
सहज प्रतिसाद दिला.
नि नंतर
खूप मोकळा झालो...
गुंजत राहिला
पाखरांचा हर्षकल्‍लोळ रानभर...
अगदी पहिल्‍यांदाच.

निर्झरांचे
कारंजे व्‍हावे;
नि नंतर
सारे अवकाशच सप्‍तरंगी व्‍हावे...
अशीही शक्‍ती असते
मोकळे होण्‍यात
मेरी...
पण हे एकदाच.

अवकाशाचे सप्‍तरंग
वणव्‍याचे इंधन असते,
अन्
मी ते पुरवू इच्छित नाही.

84, 30 जानेवारी
मेरी..
अपरिहार्यपणे
तर मी स्थिर होत गेलो नाही ना ?
नोंदींची उत्‍कटता
हरपत तर नाही ना ?

स्‍वतःचा व्‍यवहारदर्शी आनंद
सर्वोत्‍तम असतो का ?
मेरी,
मी दोष देत नाहीये तुला;
दिला नाही.
कदाचित देणारही नाही.

फक्‍त अंतर्मुख झालोय;
समजावतोय स्‍वतःलाः
'मेरीसुद्धा माणूस आहे.
आणि म्‍हणून तीही
आस्‍वादते, अपेक्षिते
सारं मानवसापेक्ष.'

मेरी...
एका निखळ आनंदावर,
प्रतीक्षेवर
दरड कोसळल्‍याची तीव्रता
मला भासली.
हेच कारण होतं ना
तुझ्याविषयी अंतर्मुख होण्‍यात ?

मेरी...
हे अंतर्मुख होणं
योग्‍य होतं की अयोग्‍य... ?

मेरी...
अशीच एक नोंद.
26 जानेवारी.
तिच्‍या आश्‍वासनांच्‍या मेघांचा
वाढदिवस.
टाळण्‍याच्‍या प्रयत्‍नात
कातरवेळ झाली नि
नकळत करु लागलो
रोषणाई...
मेरी...
किमान स्‍मरलं असेल का तिने
तिच्‍या त्‍या
क्षितीजपार
रित्‍या मेघांना... ?

अपेक्षांचा वडवानळ नाही.
तरीही
जिवंतपणाची खूण म्‍हणून
ही नोंद करावीशी वाटली का ?

84, 8 फेब्रुवारी
निखळत्‍या क्षणांची
लक्‍तरं
बांधून ठेवलेल्‍या गठ्ठ्याची
गाठ अगदी सैल;
कधीही सुटेल...

मेरी...
निरर्थकतेच्‍या
कोशातून
बाहेर पडण्‍याचा प्रयत्‍न
किती ग सार्थ ... ?

निरोपाचे
वेध
आतापासून लागलेत...
मेरी...
प्रचंड कुचंबलोय.

84, 1 मार्च
शेवटची निरवानिरव...
सामान चढवलं जातंय...
...बोट आता सुटेल...
बेटाचे किनारे कायमचे अंतरतील...

84, 7 मार्च
बेटावरील अनभिज्ञ झाडांच्‍या फांद्या
अशा शेवटच्‍या क्षणी आरक्‍त होऊ लागल्‍याहेत.
बोट सुटणे तर अपरिहार्य....
निरोप देतील ह्या आरक्‍त फांद्या... ?
मेरी...
व्‍यूहांची अखंड मालिका...एका पाठी एक...
एक सलग व्‍यूह. अभेद्य.

दुर्लक्षित क्षेत्रं
आताच कशी हिरवटली... ?
मोजदाद नाही;
परंतु दखल तरी... ?

84, 26 मार्च
मेरी...
रिक्‍तता वादळास आमंत्रण देते.
जहाज सुटताना
निदान किना-याशी वावटळ नको.

सरते दिवस...
किनारा.
बंदर.
खडकांवर फुटणा-या लाटा...
दूर काळोख समुद्रात
संथ चंद्रबोट...

एकाकी पारवे
कलकलतील...

चंद्र धूसर होईल.
वाळवंट बेधुंद गाईल.

चंद्रकोरींचा निर्देश तिचा
संधिप्रकाशातून लोळ होतोय आता.

चर्चही कुलुपबंद होतं.
सुनसान आवारात
पाय-यांवर येशूचे
रक्‍तओहोळ
मी शोधू लागतो.

वेदनांचे ठसे उमटत नाहीत.
पावलांचा आवाज
काळोख चिरीत दूर दूर होतो...

84, 27 मार्च
मेरी...
गॉर्कीचे बालपण... प्रवास... टॉलस्टॉय...
'असा किती काळ भावना गुदमरवणाराहेस ?
हा प्रश्‍न.
ध्‍येयवाद शुष्‍क असतो का ?

गॉर्कीला का अनुभवावाव लागला कोंदटपणा ?
'आई' अणुबॉम्‍ब झाली.
पावेलचा ग्रुप... ओसाडीत उगवणारा तृण....
बर्फ.... कोळसा...
इंजिन...
पण गॉर्की असा का जगला ?

इंधनः
हमीदची मैत्रिण... पहाटेपर्यंतची बोलणी...
हमीद परंपरेचा दुष्‍मन...
पण शेवटी अर्ध्‍यातच का कळी गळली ?

रणांगणात हिरवळ शोधणं अत्‍यंत अयोग्‍य का ?
'हॅर्टा'ने ही चूक केली.
प्रायश्चित घेतलं.
हे प्रायश्चित होऊ शकेल का ?
प्रायश्चित वेदनादायक असतं. पण हॅर्टाने अंतिम पर्याय, वेदनांचा शेवट म्‍हणून स्‍वतःला संपवलं.

फक्‍त एक अध्‍याय तर संपणार आहे !
मग का उगीच शब्‍दकल्‍लोळ भाववाही ?
आताशा तयारी पूर्ण होतेय...
खरी चढाई यानंतरच.

मेरी...
एकाकी चर्चमध्‍ये तुझ्या अबोल पुतळ्याशी
माझा हा एकतर्फी संवाद-
माझेच प्रश्‍नः उत्‍तरेही माझीच -
कदाचित संपणार तर नाही ?

तसं एक चर्च असंख्‍यांनी तुडुंब.
पण एकटक 'मेरी'च्‍या डोळ्यांत विरल्‍यानंतर
मी एकाकी. चर्च एकाकी. मेरी एकाकी.

चर्चची सर्वात मौल्‍यवान देणगी 'मेरी'.
रक्‍तओहोळातही सजीवत्‍व माझं तिनेच
जपलं-
मेरी नसती तर-

खूप भयानक !
चर्चच्‍या ज्‍वालामुखीतून
मीही बाहेर पडून निश्‍चल झालो असतो
एक अग्निजन्‍य खडक म्‍हणून.
खडकः
संवेदनांस नकार.
स्थितप्रज्ञ.
अविकारी.

84, 28 मार्च
मेरी...
ती विचारते-
तू इतका मागे का ?
बघतेः
हे बरं नाही. तुला खूप पुढे जायचंय.

मी हसतो. बोलतो. चटकन निघतो.
मेरी, अस्‍थी वेचेल ती... ?

84, 30 मार्च
नांगर उचलले जाताहेत...
मेरी,
आहार तिने दिला स्‍वहस्‍ते...
अगदी शेवटचा... ?
सूर फडफडत गेले शेवटची शीळ म्‍हणून...
यानंतर-
कमाल बधीरता...
अचाट स्थितप्रज्ञत्‍व...
मेरी...
मेरी...
मेरी...
मेरी...
मेरी...
मेरी...
मेरी...
मेरी....
सरलं ग शेवटी... कायमचं... कायमचं... कायमचंच !

No comments:

Post a Comment